Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी बेंगलुरू येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा (KSR) रेल्वे स्थानकावरून तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यापैकी बेंगलुरू-बेळगावी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधानांनी प्रत्यक्ष केले, तर श्री माता वैष्णो देवी कटरा-अमृतसर आणि अजनी (नागपूर)-पुणे या मार्गावरील ट्रेनचे उद्घाटन व्हर्च्युअली झाले.
या ट्रेनमुळे प्रादेशिक संपर्क सुधारण्यासोबतच प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव मिळेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांचा ताफा रेल्वे स्थानकाकडे जात असताना रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लोकांनी “मोदी, मोदी”च्या घोषणांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनीही कारमधून हात हलवून लोकांचा उत्साहाला प्रतिसाद दिला.
बेंगलुरू-बेळगावी वंदे भारत एक्सप्रेस ही कर्नाटकातील ११वी वंदे भारत सेवा आहे. ही ट्रेन ६११ किलोमीटरचे अंतर अवघ्या ८.५ तासांत पूर्ण करेल, जी या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन आहे. यामुळे बेंगलुरूहून बेळगावीला जाण्यासाठी १ तास २० मिनिटे आणि बेळगावीहून बेंगलुरूला येण्यासाठी १ तास ४० मिनिटे वाचतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही ट्रेन भारताची सिलिकॉन सिटी बेंगलुरू आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाचे केंद्र असलेल्या बेळगावीला जोडते, ज्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक संधींना चालना मिळेल. हा मार्ग कर्नाटकच्या समृद्ध ऊस पट्ट्यातून जातो आणि धारवाड (प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांसाठी ओळखले जाणारे), हुबळी (मोठे व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र), हावेरी (उदयोन्मुख कृषी केंद्र), दावणगेरे (कापड आणि कृषीसाठी प्रसिद्ध) आणि तुमकूर (वाढते औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र) यांसारख्या प्रमुख शहरांमधून प्रवास करते. या सुधारित संपर्कामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बेंगलुरूच्या विस्तृत संधींचा जलद लाभ घेता येईल, तसेच प्रादेशिक आर्थिक वाढ आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल, असे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
उद्घाटनानंतर, विशेष उद्घाटन ट्रेन (ट्रेन क्रमांक ०६५७५) बेंगलुरूहून बेळगावीला जाईल, जी सकाळी ११:१५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८:०० वाजता बेळगावीला पोहोचेल. या ट्रेनला यशवंतपूर, तुमकूर, दावणगेरे, एसएमएम हावेरी, एसएसएस हुबळी आणि धारवाड येथे थांबे असतील.