Truth Of E20 Petrol: सोशल मीडियावर २०% इथेनॉल मिश्रित (E20) पेट्रोलमुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत मोठी घट आणि इंजिन तसेच इंधन टाकीचे नुकसान होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्टता आणली आहे. मंत्रालयाने या दाव्यांना ‘वैज्ञानिक आधार नसलेले’ आणि ‘खोटे’ ठरवले असून, E20 पेट्रोलमुळे इंधन कार्यक्षमता केवळ किरकोळ प्रमाणात कमी होते, असे सांगितले आहे. चला, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
E20 पेट्रोलचे फायदे
मंत्रालयाने E20 पेट्रोलचे अनेक फायदे अधोरेखित केले आहेत. इथेनॉल हे ऊस, मका, तुटलेली तांदूळ आणि शेतीतील कचऱ्यापासून बनवले जाणारे नवीकरणीय इंधन आहे, जे पेट्रोलच्या तुलनेत कमी प्रदूषण करते. नीति आयोगाच्या अभ्यासानुसार, ऊसापासून बनवलेले इथेनॉल ६५% आणि मक्यापासून बनवलेले इथेनॉल ५०% कमी हरितगृह वायू उत्सर्जन करते. यामुळे E20 पेट्रोलमुळे कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जनात लक्षणीय घट होते.
इथेनॉलचे उच्च ऑक्टेन मूल्य (१०८.५) पेट्रोल (८४.४) पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे आधुनिक वाहनांमध्ये इंजिनची कार्यक्षमता आणि राइडिंगचा अनुभव सुधारतो. याशिवाय, इथेनॉलमुळे इंजिनमधील हवेच्या मिश्रणाची घनता वाढते, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढते.
आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ
E20 पेट्रोलमुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होत आहे, कारण यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबित्व कमी होते. २०१४-१५ पासून इथेनॉलच्या वापरामुळे भारताने १.४ लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचवले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना १.२ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. इथेनॉल मिश्रणामुळे ७०० लाख टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी झाले आहे, जे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
E20 चा प्रवास आणि भविष्य
भारताने २००१ मध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमाची सुरुवात केली होती. २०२१ मध्ये नीति आयोगाने तयार केलेल्या ‘रोडमॅप फॉर इथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया २०२०-२५’ नुसार, २०२५-२६ पर्यंत देशभरात E20 पेट्रोल लागू करण्याचे उद्दिष्ट आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (R&D) यांच्या चाचण्यांनुसार, E20 मुळे जुन्या वाहनांमध्ये कोणतेही मोठे नुकसान किंवा कार्यक्षमतेत लक्षणीय घट होत नाही.
सोशल मीडियावरील गैरसमज
X वर काही युजर्सनी E20 मुळे इंजिनचे नुकसान, रबर सील्सचा झीज आणि इंधन कार्यक्षमतेत मोठी घट होत असल्याचे दावे केले आहेत. मात्र, मंत्रालयाने हे दावे खोडून काढले असून, याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. E20 साठी BIS आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्सनुसार गंजरोधक आणि सुसंगत साहित्य वापरले जाते, ज्यामुळे वाहनांची सुरक्षा सुनिश्चित होते.