Tomato Price Hike: टोमॅटोच्या किंमतींनी शंभरी गाठली असून, यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक यांसह देशभरातील अनेक बाजारपेठांमध्ये टोमॅटोचा भाव 100 ते 120 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. यावर्षी कांद्याच्या किंमतींनी शेतकऱ्यांना हैराण केले असताना, टोमॅटोच्या दरवाढीने ग्राहकांना चिंतेत टाकले आहे. जून-जुलैच्या मुसळधार पावसाने टोमॅटोच्या पिकांचे नुकसान केले आणि पुरवठा खंडित झाल्याने भाव वाढले. पण, ही दरवाढ कायम राहणार का? की लवकरच दिलासा मिळणार? जाणून घेऊया.
टोमॅटोच्या किंमतीत वाढ का?
भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी टोमॅटोच्या किंमती वाढण्यामागील कारणे स्पष्ट केली. जून आणि जुलै 2025 मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोच्या पिकांचे 30 ते 40 टक्के नुकसान झाले. याशिवाय, पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला, आणि टोमॅटो बाजारपेठेत वेळेत पोहोचू शकले नाहीत. यामुळे टोमॅटोची आवक लक्षणीयरीत्या घटली. कर्नाटकमधून टोमॅटोची आवक 35 टक्क्यांनी घसरून 82,000 टनांवर आली, तर उत्तर भारतातील आवक जुलै महिन्यात केवळ 4.16 टनांवर मर्यादित राहिली. याचा थेट परिणाम किंमतींवर झाला.
किरकोळ बाजारातील किंमती
केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात टोमॅटोची सरासरी किंमत 50.88 रुपये प्रति किलो आहे. परंतु, किरकोळ बाजारात ग्राहकांना 80 ते 120 रुपये प्रति किलो मोजावे लागत आहेत. महिनाभरापूर्वी टोमॅटोचा भाव 39.30 रुपये प्रति किलो होता, जो आता जवळपास दुप्पट झाला आहे. राज्यनिहाय किंमतींचा तपशील पुढीलप्रमाणे:
- महाराष्ट्र: 38.37 रुपये/किलो वरून 48.37 रुपये/किलो
- मध्य प्रदेश: 38.7 रुपये/किलो वरून 52.34 रुपये/किलो
- उत्तर प्रदेश: 38.78 रुपये/किलो वरून 63.50 रुपये/किलो
- दिल्ली: 53 रुपये/किलो वरून 73 रुपये/किलो
किरकोळ बाजारात सरासरी किंमतींपेक्षा 30 ते 50 रुपये जास्त मोजावे लागत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.