बातमीवाला: भारतात अनेक धार्मिक स्थळे आहेत जिथे लाखो भाविक येतात आणि कोटी कोटी रुपयांच्या देणग्या देतात. पण या पैशांचा वापर कसा होतो, यावरून नेहमीच प्रश्न उपस्थित होतात. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान मात्र यातून वेगळे ठरते. हे संस्थान केवळ धार्मिक कार्य करत नाही, तर समाजसेवा, शिक्षण आणि विकासकामांवरही प्रचंड भर देते. अनेकांचे मत आहे की हे संस्थान देशातील सर्व धार्मिक ट्रस्टसाठी एक आदर्श आहे.
देशात अशी अनेक देवस्थाने आहेत जिथे देणग्या गोळा करणे आणि मंदिरावर सोन्याचे आवरण चढवणे यालाच प्राधान्य असते. ट्रस्टी स्वतःच्या वैभवासाठी पैसा वापरतात, असा आरोपही वारंवार होतो. काही ठिकाणी सामाजिक कामांसाठी थोडा निधी दाखवला जातो, पण तो केवळ प्रसिद्धीसाठी. भाविकांची आंधळी भक्ती याला कारणीभूत असते. पण याच गर्दीत शेगावचे संस्थान आशेचा किरण ठरते.
शिवशंकर पाटील ऊर्फ शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निःस्वार्थ नेतृत्वामुळे हे संस्थान आज जागतिक दर्जाचे झाले आहे. मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो लोकांची वेटिंग लिस्ट आहे. सध्या तीन हजारांहून अधिक सेवेकरी श्रद्धेने काम करतात. येथील स्वच्छता, व्यवस्था आणि तन्मयता प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजणार नाही.
संस्थानाची वार्षिक उलाढाल आता १३७ (२०२१ ची आकडेवारी) कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या पैशांतून महाराष्ट्रातील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय उभे राहिले. आनंदसागर हे जागतिक दर्जाचे नंदनवनही याच निधीतून साकारले. रुग्णालये, औषधे, शिक्षण आणि गरिबांसाठी मदत – यावर मोठा खर्च केला जातो. शेगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तसेच रस्त्यांसाठी संस्थानाने कोट्यवधी रुपये दिले, ज्यामुळे शहरातील पाण्याची टंचाई कायमची दूर झाली.
येथील महाप्रसादाची पाकशाळा ही आधुनिकतेचा उत्तम नमुना आहे. दररोज हजारो- लाखो भक्तांसाठी नाश्ता-जेवण केवळ दोन तासांत तयार होते. एसएपी सॉफ्टवेअरचा वापर, कायझन तत्त्व, निर्जंतुक कंटेनर, मसाले मोजून पॅक – सगळेच जपानी कंपन्यांना लाजवेल असे. गाड्यांच्या इंजिनखालीही तेल गळू नये म्हणून ट्रे ठेवल्या जातात. इथे एक पानही रस्त्यावर पडलेले सापडत नाही.
हि सर्व व्यवस्था पाहून सिटी बँकेचे माजी सीईओ विक्रम पंडित इतके प्रभावित झाले की त्यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याची ऑफर दिली. पण संस्थानने फक्त गरजेनुसार घेतले आणि तेही वेळेत परत केले. कारण महाराजांचा असा संदेश असायचा की गरजे पुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा.
दुसरीकडे महाराष्ट्रातील इतर देवस्थाने पहिली तर अशा ठिकाणी दरवर्षी शेकडो कोटी रुपये जमा होतात. तरीही शेतकरी १२ हजार रुपयांसाठी आत्महत्या करतात आणि ही देवस्थाने बँकेत ठेवलेल्या कोट्यवधींचे व्याज उपभोगत बसतात.
धार्मिक ट्रस्ट कसा चालवावा, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शेगावचे संत गजानन महाराज संस्थान. इथे पैसा तळघरात सोने-चांदी साठवण्यासाठी नाही, तर लोकांसाठीच वापरला जातो. अशा संस्थांना पाहिले की मनाला शांती मिळते आणि विश्वास वाटतो की खरे संत आजही आपल्यातच आहेत.














1 thought on “धार्मिक ट्रस्ट कसा चालवावा, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शेगावचे श्री संत गजानन महाराज संस्थान”