बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सैलानी येथे एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शेतकरी कुटुंबांवर असलेल्या आर्थिक आणि मानसिक ताणतणावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पिंपळगाव सैलानी (जि. बुलढाणा) येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र किसन गुंड यांचा २६ वर्षीय मुलगा संकेत राजेंद्र गुंड याने शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी नेहमीप्रमाणे संकेत गाईचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेला होता. दूध काढल्यानंतर त्याने दूध गोठ्याच्या बाहेर ठेवले आणि दोरीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
राजेंद्र किसन गुंड हे पिंपळगाव सराई येथील अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्या मालकीची ०.८१ हेक्टर जमीन (गट नं. १४५) आहे. या जमिनीवर त्यांचे आजोबा किसन गुंड यांच्या नावे भारतीय स्टेट बँकेच्या बुलढाणा शाखेतून ४० हजार रुपयांचे कर्ज आहे. शेती हा या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, कर्जाचा बोजा आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे शेतकरी कुटुंबांवर सतत ताण असतो. संकेतने अचानक इतका टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस ठाण्याचे सुधीर जोशी आणि अझरुद्दीन काझी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी गावचे पोलिस पाटील रामेश्वर गवते, ग्रामविकास अधिकारी अविनाश मानकर, तलाठी राऊत आणि एकनाथ सुरोशे उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना गेल्या काही वर्षांत चिंताजनकरीत्या वाढल्या आहेत. नुकतेच भरोसा येथे शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपवले. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पीक विम्याच्या दिरंगाईसारखी कारणे शेतकऱ्यांना हतबल करतात. याशिवाय, शेतकरी कुटुंबातील सदस्यही शेतीच्या कामात हातभार लावत असतात. संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक नियोजन हे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत कुटुंबातील कर्त्या तरुणाने आत्महत्या केल्याने गुंड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
1 thought on “गोठ्यात गेला दूध काढून ठेवले, अन् गळफास घेत संपवलं जीवन; पिंपळगाव सैलानीतील धक्कादायक घटना”