Operation Shivshakti: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LoC) मंगळवारी रात्री घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार केले. ऑपरेशन शिवशक्ती अंतर्गत चाललेल्या या चकमकीत भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असण्याची शक्यता असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही कारवाई पूंछच्या डेगवार सेक्टरमधील कालसियान-गुलपूर परिसरात 29 जुलै 2025 रोजी रात्री 11:30 वाजता सुरू झाली आणि 30 जुलै सकाळी 10:00 वाजेपर्यंत चालू होती. या ऑपरेशनमध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून, दोन AK-47 रायफल्स, एक पिस्तूल आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे.
भारतीय लष्कराच्या 16 कॉर्प्सने या यशस्वी कारवाईची पुष्टी केली आहे. व्हाइट नाइट कॉर्प्सने X वर पोस्ट केले की, “ऑपरेशन शिवशक्ती: भारतीय लष्कराच्या सतर्क जवानांनी नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. अचूक गोळीबाराने दहशतवाद्यांचे कुटील डाव उधळले गेले. दोन AK-47 रायफल्स आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ऑपरेशन सुरू आहे.” या कारवाईला जम्मू-काश्मीर पोलिसांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुप्तचर माहितीच्या आधारावर लष्कराने तातडीने कारवाई करत दहशतवाद्यांना चकमकीत अडकवले. दहशतवाद्यांची ओळख तपासली जात असून, त्यांचा लष्कर-ए-तय्यबाशी संबंध असण्याची शक्यता आहे.
ही चकमक पूंछच्या डेगवार सेक्टरमधील कालसियान-गुलपूर परिसरात घडली, जिथे लष्कराच्या जवानांनी सीमेपलीकडून येणाऱ्या दोन दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. रात्रीच्या अंधारात सुरू झालेल्या या चकमकीत लष्कराने अचूक गोळीबार करत दहशतवाद्यांना ठार केले. यामुळे दहशतवाद्यांचा भारतात घुसखोरीचा कट उधळला गेला. ऑपरेशन अजूनही सुरू असून, परिसरात सर्च ऑपरेशन चालू आहे, ज्यामुळे आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पूंछ आणि राजौरी हे परिसर गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील राहिले आहेत. यापूर्वीही या भागात अनेक घुसखोरीचे प्रयत्न आणि हल्ले झाले आहेत. ऑपरेशन शिवशक्ती ही भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या समन्वयाने केलेली यशस्वी कारवाई आहे, ज्याने सीमेवरील सुरक्षेची पकड मजबूत केली आहे. या ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उध्वस्त झाले असून, भारतीय लष्कराच्या सतर्कतेचे आणि सामर्थ्याचे दर्शन घडले आहे.