Maharashtra Monsoon: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने नमूद केले.
30 जुलै रोजी नागपूर, भंडारा, रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील इतर जिल्हे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे आज अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
31 जुलै रोजी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम राहील, आणि तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भात नद्या आणि ओढ्यांच्या काठावर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
1 ऑगस्ट रोजी विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील. हवामान विभागाने नमूद केले की, बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली आणि अरबी समुद्रातील चक्री वाऱ्यांमुळे विदर्भात पावसाची तीव्रता वाढली आहे.