Ladki Bahin Yojana Fraud: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेतून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या १४,२९८ पुरुषांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, त्यांच्याकडून आतापर्यंत वितरित केलेली रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर या लाभार्थ्यांनी पैसे परत न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. या योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराने विरोधकांना टीकेचे नवे आयुध मिळाले असून, सरकार आता ‘अॅक्शन मोड’वर आले आहे.
सरकारची कारवाई आणि इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले, “ही योजना गरीब महिलांसाठी आहे. पुरुषांनी याचा लाभ घेण्याचे काहीच कारण नाही. ज्यांनी गैरमार्गाने पैसे घेतले, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. सहकार्य न केल्यास कठोर कारवाई करू.” महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी X वर पोस्ट करत सांगितले की, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने २६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणारे, कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेले आणि पुरुषांचा समावेश आहे. या अपात्र लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम तात्काळ थांबवण्यात आली असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पैसे वसुली आणि कारवाईची प्रक्रिया
सरकारने अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. येत्या ३० दिवसांत पैसे परत न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याशिवाय, बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या आणि अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज सादर करून योजनेचा गैरलाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे, ज्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.