Indian Nurse Nimisha Priya in Yemen: केरळमधील पालक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील 38 वर्षीय भारतीय नर्स निमिषा प्रिया हिची येमेनमधील फाशीची शिक्षा 16 जुलै 2025 रोजी स्थगित करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालय (MEA), सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम, आणि येमेनमधील सूफी विद्वान हबीब उमर बिन हाफिज यांच्या प्रयत्नांमुळे हा तात्पुरता दिलासा मिळाला. ग्रॅन्ड मुफ्ती कांथापुरम एपी अबूबकर मूसलियार यांच्या कार्यालयाने फाशी रद्द झाल्याचा दावा केला असला, तरी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळला आहे. सध्या पीडितेच्या कुटुंबाशी ‘दिया’ (रक्तपैसे) करारासाठी वाटाघाटी सुरू असून, येमेन सरकारकडून फाशी रद्द झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.
निमिषा 2008 मध्ये आर्थिक अडचणींमुळे येमेनला नर्स म्हणून काम करण्यासाठी गेली. तिने सना येथील सरकारी रुग्णालयात काम केल्यानंतर 2015 मध्ये स्थानिक नागरिक तलाल अब्दो मेहदी याच्यासोबत क्लिनिक सुरू केले, कारण येमेनच्या कायद्यानुसार परदेशी व्यक्तींना स्थानिक भागीदाराशिवाय व्यवसाय करता येत नाही. सुरुवातीला त्यांचे संबंध चांगले होते, परंतु नंतर मेहदीने निमिषाचा पासपोर्ट हिसकावला, तिच्या क्लिनिकच्या 70% उत्पन्नावर डल्ला मारला, तिला नियमित मारहाण केली, आणि बनावट कर्जाची कागदपत्रे तयार करून तिला कायदेशीर अडचणीत आणले.
2017 मध्ये, निमिषाने आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी मेहदीला सेडेटिव्हजचे इंजेक्शन दिले, परंतु डोस जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने त्याचे शव विखंडित करून पाण्याच्या टाकीत टाकले आणि सौदी अरेबियाच्या सीमेजवळ पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला अटक झाली. 2018 मध्ये तिला खुनाचा दोषी ठरवण्यात आले, आणि 2020 मध्ये येमेनी न्यायालयाने मृत्यूदंड सुनावला. 2023 मध्ये तिची अपील फेटाळण्यात आली, आणि डिसेंबर 2024 मध्ये येमेनच्या राष्ट्रपतींनी फाशीला मंजुरी दिली.
16 जुलै 2025 रोजी नियोजित फाशीच्या एक दिवस आधी, भारतीय दूतावास आणि सॅम्युअल जेरोम यांच्या प्रयत्नांमुळे फाशी स्थगित झाली. मुफ्ती मूसलियार यांनी हबीब उमर बिन हाफिज यांच्याशी संपर्क साधून वाटाघाटींना गती दिली. सध्या निमिषाच्या कुटुंबाने आणि समर्थकांनी ‘दिया’साठी 40,000 अमेरिकी डॉलर जमा केले आहेत, परंतु मेहदीच्या कुटुंबाने 120,000 डॉलरची मागणी केली आहे. मेहदीच्या भावाने माफी देण्यास नकार दिला असून, फाशीची मागणी कायम ठेवली आहे.
भारत सरकारने निमिषाच्या कुटुंबाला कायदेशीर मदत पुरवली आहे आणि सना येथील तुरुंगात नियमित कौन्सुलर भेटींची व्यवस्था केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सरकार मेहदीच्या कुटुंबाशी परस्पर संमतीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. निमिषाची आई प्रेमा कुमारी सध्या सना येथे आहे आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत आहे.
या प्रकरणाने येमेनच्या शरिया कायद्यांतर्गत ‘दिया’च्या प्रथेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. निमिषाच्या कुटुंबाला आणि समर्थकांना आशा आहे की, मेहदीचे कुटुंब माफी देईल, ज्यामुळे तिचा जीव वाचेल.