IIT Bombay Student Sucide: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे येथील एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने शनिवारी पहाटे हॉस्टेलच्या १०व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव रोहित सिन्हा असे आहे. तो दिल्लीचा रहिवासी असून मेटलर्जिकल सायन्सेसचा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. या घटनेमुळे आयआयटी परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. रोहितने हॉस्टेलच्या १०व्या मजल्यावरून उडी मारली, त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पवई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली असून तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी रोहितसोबत हॉस्टेलच्या टेरेसवर आणखी एक विद्यार्थी होता, जो फोनवर बोलत होता. या विद्यार्थ्याने रोहितने उडी मारताना पाहिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला असून रोहितच्या कुटुंबीयांचेही जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विशेषत: रोहित कोणत्या मानसिक तणावातून जात होता का, याचा शोध घेतला जात आहे.
स्रोत: पवई पोलीस आणि आयआयटी बॉम्बे प्रशासन यांच्याकडून मिळालेली माहिती