मेहकर / प्रतिनिधी (बातमीवाला): मेहकर शहरात घडलेल्या या दुःखद घटनेने सर्वांना हळहळ वाटत आहे. एका गरीब कुटुंबातील दीड वर्षांच्या मुलीचा तापाने मृत्यू झाला. पैशाअभावी कुटुंबाने मोकळ्या जागेत साधा खड्डा खोदून तिच्यावर अंत्यसंस्कार केला. पण खड्डा उथळ असल्याने दुसऱ्याच दिवशी मोकाट कुत्र्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि तुकडे केले. या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली.
७ नोव्हेंबरच्या सकाळी पीर मोहंमद उर्दू शाळेच्या मागे, नगरपरिषद शौचालयाजवळ मृतदेहाचे तुकडे सापडले. हे पाहून तिथे लोकांची तुफान गर्दी झाली. सुरुवातीला ‘मुलीची हत्या झाली’ अशी अफवा पसरली. मेहकर पोलिसांनी तातडीने डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम बोलावले. तपासात समजले की, ही मुलगी जानेफळ रोडवरील झोपडीत राहणाऱ्या भटक्या कुटुंबाची आहे.
ही चिमुकली काही दिवसांपासून तापाने आजारी होती. ६ नोव्हेंबरच्या रात्री तिचा मृत्यू झाला. कुटुंबाने महानुभाव पंथ मंदिराजवळ साधा खड्डा खोदला. पण तो पुरेसा खोल नव्हता. रात्री कुत्र्यांनी माती उकरली आणि मृतदेहाचे लचके तोडले. सकाळी हे भयंकर दृश्य दिसताच परिसरात भीती आणि दुःख पसरले.















