हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्यात बुलढाण्याची जागा सोडतो! आमदार संजय गायकवाडांचा इशारा

On: October 31, 2025 5:03 PM
Follow Us:
chikhli nagarparishad nivadnuk shinde shivsena meeting

चिखली (बातमीवाला): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेनेने चिखलीत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले. काल दि. ३० ऑक्टोबरला राधाबाई खेडेकर विद्यालयात झालेल्या या बैठकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी युतीच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्या या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

या बैठकीत आमदार गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख, अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, कपिल खेडेकर, अर्जुन नेमाडे, राजू पाटील, शरद हाडे, कल्पनाताई बोधेकर, संतोष भुतेकर, पंजाबराव जावळे, राम देशमुख यांसारख्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. शहर प्रमुख विलास घोलप यांच्या आयोजनात ही बैठक यशस्वी झाली.

कार्यक्रमाच्या यशाबाबत शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. पवन चिंचोले, राहुल शेलकर, विक्रांत नकवाल, राका मेहेत्रे, अमर सुसर, अमर काळे, सतीश हिवाळे, विनोद वनारे, साहिल काझी, योगेश गवई, बलराज शेटे, दीपक मगर, विकी निकाळजे, नारायण देशमाने, संदीप अंभोरे, मदन राऊत यांसह सर्व कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवडणूक तयारीवर सखोल चर्चा झाली.

याच वेळी हेमंत खेडेकर (माजी नगरसेवक), सचिन चोरघडे, समाधान बांडे, पांडा जेठे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोर्डे आणि व्यापारी असोसिएशनचे राकेश चोपडा यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. हे नवे सहकारी पक्षाला अधिक बळकटी देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी युतीबाबतचे स्फोटक विधान केले. “युती करायची असेल तर संपूर्ण जिल्ह्यात सन्मानजनक रीतीने करा. काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी नाही, असे आम्हाला मान्य नाही. चिखलीत नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, त्याबदल्यात मी बुलढाण्याची जागा सोडण्यास तयार आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या शब्दांनी उपस्थितांमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बाहेर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांबाबत युती-आघाडीची अनिश्चितता कायम आहे. मात्र, गायकवाडांच्या या ठाम भूमिकेमुळे चिखलीत शिंदे शिवसेनेने स्वबळावरच तयारी सुरू केल्याचे सूचित होत आहे. “युतीचा अंतिम निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार, जिल्हा प्रमुख आणि संपूर्ण जिल्हा कमिटी एकत्र घेणार आहे,” असेही गायकवाड यांनी नमूद केले. या घोषणेमुळे चिखली तालुक्यातील राजकीय उष्णता आणखी वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे.

Raj Dhanve

हे गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. बँकिंग, फायनान्स, गुंतवणूक, नोकऱ्या, सरकारी धोरणे, योजना, राजकारण आणि ब्लॉगिंग या विषयांवर ते सातत्याने लिहितात. बातमी फक्त सांगणं नव्हे, तर तिचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय होतो हे समजावून सांगणं, हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. अचूक माहिती, विश्वासार्ह स्रोत आणि निष्पक्ष मांडणी यावर त्यांचा भर असतो, जेणेकरून वाचकांना योग्य निर्णय घेता येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!