चिखली (बातमीवाला): सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट दिशादर्शक भूमिकेबद्दल संकल्प अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून सन २०२४-२५ चा प्रतिष्ठित राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. अमरावती विभागातील या संस्थेच्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, जो सहकारिता क्षेत्रातील संस्थांसाठी खूप मोठा सन्मान मानला जातो. या सोहळ्यात अनेक मान्यवर व्यक्तींनी हजेरी लावली होती आणि त्यांच्या हस्ते संस्थेला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे, डॉ. संजय होसमठ, मा. आण्णासाहेब जोले, मा. प्रभाकर कोरे तसेच सन्माननीय माजी आमदार राहूल भाऊ बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यशाबद्दल संकल्प अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर केनेकर आणि उपाध्यक्ष श्री. अक्षय करंडे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, हे यश फक्त संस्थेचे एकट्याचे नाही, तर यात संचालक मंडळाचे मार्गदर्शन, विविध शाखांवरील सल्लागार समितींचे सहकार्य, सरव्यवस्थापकांसह शाखाधिकारी आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाचे अथक परिश्रम, तसेच ग्राहक आणि सभासद वर्गाची विश्वासपूर्ण साथ यांचे संयुक्त परिणाम आहे. “या सर्वांच्या सहभागामुळे संस्था आज या उंचीवर पोहोचली आहे आणि भविष्यातही अशा दिशादर्शक कार्यासाठी वचनबद्ध राहू” असे ते म्हणाले. या विशेष प्रसंगी त्यांनी सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त केले.
संकल्प अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेल्या काही वर्षांत ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या पुरस्काराने संस्थेच्या ध्येयाला अधिक मजबुती मिळाली असून, सहकारिता क्षेत्रातील इतर संस्थांसाठीही हे एक आदर्श ठरेल.













