Mann Ki Baat Earning’s: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ हा देशभरातील कोट्यवधी श्रोत्यांपर्यंत पोहोचत असून, 2014 मध्ये सुरू झाल्यापासून आतापर्यंत याने 34.13 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. शुक्रवारी 8 ऑगस्ट 2025 राज्यसभेत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी ही माहिती दिली. हा कार्यक्रम आकाशवाणी All India Radio द्वारे तयार केला जातो आणि यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च होत नाही, असे त्यांनी सांगितले.
‘मन की बात’चा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेटवर्कवर थेट प्रसारित होतो आणि प्रादेशिक भाषांमधील आवृत्त्या स्थानिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांशी थेट संवाद साधला जातो. मुरुगन यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम पारंपरिक आणि डिजिटल व्यासपीठांद्वारे कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतो. आकाशवाणीच्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून हा कार्यक्रम तयार होतो, ज्यामुळे खर्च शून्य आहे.”
विविध माध्यमांद्वारे प्रसारण
‘मन की बात’ केवळ रेडिओपुरताच मर्यादित नसून, दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवरही प्रसारित होतो. याशिवाय, DD Free Dish वर 48 आकाशवाणी रेडिओ चॅनेल आणि 92 खासगी टेलिव्हिजन चॅनेल उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांनाही हा कार्यक्रम पाहता येतो. मुरुगन यांनी नमूद केले की, “या कार्यक्रमाचे व्हिज्युअल स्वरूप लोकांना एकत्र पाहण्याची संधी देते, ज्यामुळे सामूहिक चर्चा आणि विचारमंथनाला चालना मिळते.”