Three New Mahanagarpalika Pune: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण परिसरातील सततच्या वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे. चाकणसह हिंजवडी, उरळी देवाची, मांजरी आणि फुरसुंगी येथे नव्या महानगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे केंद्र सरकार आणि जागतिक बँकेचा निधी मिळवून या भागांच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या चाकण दौऱ्यादरम्यान स्वतः वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. चाकण चौकात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहने रोखल्याने काही काळ ट्रॅफिक जाम झाला. यावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी पोलिसांना वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “मी सकाळपासून दौरा करतोय. एक गाडी थांबली की रांगा लागतात. मग दुपार आणि संध्याकाळच्या वेळी काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येईल,” असे त्यांनी सांगितले.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि वाढती लोकसंख्या यामुळे स्वतंत्र महानगरपालिकेची गरज असल्याचे अजित पवार यांनी अधोरेखित केले. “महानगरपालिका स्थापन केल्याशिवाय चाकणला पुरेसा निधी आणि सुविधा मिळणार नाहीत. केंद्र सरकार आणि जागतिक बँकेकडून निधी मिळवण्यासाठी हे पाऊल गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर महानगरपालिकांचे उदाहरण देत, या भागात महानगरपालिका स्थापनेमुळे विकासाला गती मिळाल्याचे नमूद केले.
चाकण परिसराची लोकसंख्या सध्या 5 लाखांपेक्षा जास्त असून, ही महानगरपालिका स्थापनेसाठी आवश्यक असलेली किमान लोकसंख्येची अट पूर्ण करते. याशिवाय, हिंजवडी, उरळी देवाची, मांजरी आणि फुरसुंगी येथेही नव्या महानगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी अजित पवार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून, येत्या काळात पुणे जिल्ह्यात नव्या महानगरपालिका स्थापन होण्याची शक्यता आहे.