Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ‘ऑपरेशन अखल’ अंतर्गत भारतीय सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. शुक्रवारी 1 ऑगस्ट रात्री सुरू झालेली ही कारवाई शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. भारतीय सेनेच्या चिनार कॉर्प्सने याबाबत माहिती देताना सांगितलं, “रात्रीभर थांबून – थांबून तीव्र गोळीबार सुरू होती. सतर्क सैनिकांनी नियंत्रित आणि अचूक प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली.”
कुलगामच्या अखल जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी संयुक्तरित्या ही कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर ही शोधमोहीम चकमकीत बदलली. आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला असून, त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हा आठवड्यातील तिसरा मोठा ऑपरेशन
‘ऑपरेशन अखल’ ही गेल्या सात दिवसांतील जम्मू-काश्मीरमधील तिसरी मोठी चकमक आहे. यापूर्वी, बुधवारी 30 जुलै ‘ऑपरेशन शिवशक्ती’ अंतर्गत पंचपोरमधील नियंत्रण रेषेजवळ (LoC) दोन दहशतवादी ठार झाले. त्याचप्रमाने, 28 जुलै रोजी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत श्रीनगरजवळील लिडवास परिसरात तीन दहशतवादी ठार झाले, ज्यामध्ये 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सुलैमान याचाही समावेश होता. हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितलं.
सुरक्षा दलांचा निर्धार
भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आपली मोहीम तीव्र केली आहे. कुलगाममधील ही कारवाई अद्याप सुरू असून, इतर दहशतवाद्यांना घेरण्यासाठी सुरक्षा दलांनी कंबर कसली आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.