78 Independence Day: दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 ऑगस्टला भारत आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहे. 1947 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून मुक्ती मिळाल्यापासून हा दिवस देशभरात ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करून साजरा केला जातो. पण, यंदा भारत 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे की 79 वा? हा प्रश्न अनेकांना पडतो. चला, यंदाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत आणि त्यामागील गणनेबाबत सविस्तर जाणून घेऊया.
78 वा की 79 वा स्वातंत्र्य दिन?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेकजण 2025 मधून 1947 वजा करून 78 वर्षे पूर्ण झाल्याने यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे, असे समजतात. पण यात एक छोटीशी चूक होते. भारताने पहिला स्वातंत्र्य दिन 1947 मध्येच साजरा केला होता, म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या वर्षापासूनच या साजरेपणाची सुरुवात झाली. त्यामुळे 2025 मध्ये भारत 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.
हा संभ्रम दूर करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (PMO) अधिकृत पत्र जारी केले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) मार्फत प्रसारित या पत्रात म्हटले आहे, “भारत आपला 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्यासाठी सर्व नागरिकांना त्यांचे विचार आणि सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.”